मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्यातल्या दात्याचं पुन्हा एकदा दर्शन घडवलं आहे. बच्चन यांनी आपण उत्तर प्रदेशमधल्या 850 शेतकऱ्यांचं कर्ज फेडत असल्याचं टम्बलर या ब्लॉगच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. याआधीही महाराष्ट्रातल्या 350 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आपण योगदान दिलं होतं हे ही बच्चन यांनी नमूद केलं आहे.

“आपल्या देशवासियांना काहीतरी परत देणं हे खूप समाधानकारक असतं. हे देशवासी आपल्यासाठी सगळं जीवन खर्च करत असतात. महाराष्ट्रामध्ये 44 कुटुंबातल्या 112 जणांना काही प्रमाणात मदत करता आली होती. यात अत्यंत शूर असा शहिदांचा समावेश होता. देशातल्या इतर भागांसाठीही बरच काही करायची गरज आहे. आणि ते करूच,” असं बच्चन यांनी म्हटलं आहे.

पुढे बच्चन म्हणतात, “असे 350 शेतकरी होते, ज्यांना त्यांचं कर्ज फेडता येणं शक्यच नव्हतं. त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची कर्ज फेडली आहेत. याआधीही आंध्र प्रदेश व विदर्भातल्या शेतकऱ्यांना सहाय्य केलं होतं. आता उत्तर प्रदेशमधल्या 850 जणांची यादी आलीय. त्यांच्या डोक्यावर 5.5 कोटी रुपयांचं कर्ज आहे, जे ते फेडू शकत नाहीयेत. संबंधित बँकेच्या सहकार्यानं हे कर्जही फेडण्यात येईल,” बच्चन यांनी आश्वस्त केलं आहे.

केबीसी कर्मवीरमध्ये सहभागी झालेल्या अजित सिंह यांनादेखील मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. “उद्याच अजित सिंहला मदत पोच होईल. तो केबीसी कर्मवीरमध्ये होता. जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या महिलांसाठी तो काम करतो. अत्यंत घृणास्पद अशा या गुन्ह्याविरोधात लढण्यासाठी त्याला मदत करण्यात येत आहे,” बच्चन म्हणतात.