टीबी हा एक असा आजार आहे ज्यावर बोलणं लोकं टाळतात. परंतु बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लोकांना जागरुकतेचा संदेश देत स्वत:ला टीबी झाल्याचा खुलासा केला. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्यासह संवाद साधताना अमिताभ यांनी हा खुलासा केला आहे. ८ वर्षानंतर टीबी झाल्याचे कळाले, असे ते म्हणाले. सर्वांनी टीबीची तपासणी केली पाहिजे, असा मोलाचा संदेशही दिला.

‘टीबी जागरुकतेचा संदेश देताना मी नेहमी स्वत:चे उदाहरण देतो आणि तुमच्यामध्ये याबाबत जागरुकता निर्माण होईल अशी आशा करतो. मला स्वत:ला टीबी आणि हेपेटाइटिस्ट-बी झाल्याचे सर्वांसमोर सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही. टीबीमुळे माझे यकृत ७५% निकामी झाले आहे. मागील २० वर्षात माझे यकृत केवळ २५%  काम करत असतानाही मी ठणठणीत आहे’ असे अमिताभ म्हणाले. ७६ वर्षीय अमिताभ लोकांमध्ये नेहमी टीबी, पोलिओ, हेपेटाइटिस्ट-बी, मधुमेह या आजारांविषयी जागरुकता निर्माण करत असतात.टीबी या आजाराची तपासणी करुन घ्यावी आणि त्यावर लवकरात लवकर औषधोपचार घेण्याचे आवाहन बिग बींनी लोकांना केले आहे.

‘प्रत्येक आजारावर उपाय असतो, मग तो टीबीही असो. मला स्वत:ला ८ वर्षे टीबी झाल्याचे माहिती नव्हते. हा आजार कोणालाही होऊ शकतो. जर तुम्ही टीबी तपासणी केली नाही तर तुम्हाला आजारबद्दल कळणार नाही आणि त्यावर तुम्ही योग्य उपचार घेऊ शकणार नाही’ असे अमिताभ यांनी पुढे सांगितले.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे देखील आवाहन केले होते. जमेल त्या पद्धतीने, जमेल त्या स्वरुपात पूरग्रस्तांना मदत करा असे आमिताभ यांनी म्हटले होते.