16 January 2019

News Flash

‘बिग बीं’च्या आयुष्यातील ‘हा’ रंगतदार किस्सा माहित आहे का?

बिग बी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ४० वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन

कलाविश्वातील महानायक अर्थात अमिताभ बच्चन वयाच्या ७५ व्या वर्षीही तेवढ्याच उमेदीने आणि जिद्दीने चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या बिग बींचा सोशल मिडीयावरही तेवढाच वावर असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अनेक वेळा ते आपल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देणा-या पोस्ट शेअर करत असतात. त्यातच त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्यांच्या आयुष्यातील एक रंगतदार किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

बिग बी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ४० वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली आहे. या ट्वीटरमध्ये त्यांनी एक फोटोही शेअर केला असून यात त्यांच्याबरोबर दोन माकडंदेखील दिसून येत आहेत. या माकडांपैकी एका माकडाला ते खाद्यपदार्थ देत असताना दुस-या माकडाने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

१९७८ मध्ये आलेला ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटातील एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो त्यांनी शेअर केला असून यात त्यांच्याबरोबर दोन माकडं दिसून येत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी या फोटोला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. ‘गंगा की सौगंध चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ऋषिकेशमध्ये असलेल्या लक्ष्मण झुल्यावर एका माकडाला खाऊ देत असताना दुस-या माकडाने माझ्या कानशीलात लगावली..कदाचित मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची जाणीव त्याला झाली असावी आणि म्हणूनच त्याने माझ्यावर हल्ला केला’, असं कॅप्शन देत बिग बींनी आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह राहणा-या बिग बींचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्यांच्याबरोबर प्रथमच आमिर खान स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच  या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय कृष्ण आचार्य यांनी उचलली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती जादू चालवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on June 13, 2018 4:49 pm

Web Title: amitabh bachcan reveals the incident when langur attacked