बॉलिवूडमधील महानायक म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा मागील काही वर्षांपासून प्रसिद्धीपासून काहीशी दूर असल्याचे चित्र आहे. मात्र नुकतेच तिने आपल्या वडिलांबरोबर एका जाहिरातीच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. आता ती आपली पहिली कादंबरी प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती ही कादंबरी प्रकाशित करणार आहे. त्यामुळे बिग बींचा ७६ वा वाढदिवस खास असेल असे श्वेताचे म्हणणे आहे. ११ ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १० ऑक्टोबरला श्वेता बच्चन हिने लिहीलेल्या कादंबरीचे प्रकाशन होईल.

या कादंबरीचा विषय मुंबईच्या घरांतील कहाणी असा असून त्याचे नाव ‘पॅराडाईज टॉवर्स’ असल्याचे श्वेताने सांगितले आहे. तिचे हे पुस्तक हार्परकोलिंस इंडियाकडून प्रकाशित केले जाणार आहे. या कादंबरीच्या निमित्ताने श्वेता लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण करेल असे म्हटले जात आहे. हे पुस्तक लिहीण्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली हे सांगताना श्वेता म्हणते, माझे आजोबा हरीवंशराय बच्चन यांच्यासोबत मी मोठी झाले. ते मोठे कवी आणि लेखक होते. त्यामुळे लिहीणे आणि वाचणे हा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता. मी लहानपणापासून डायरी लिहायचे. कधीतरी कथाही लिहायचे, पण मी त्या कधी कोणासमोर सादर केल्या नाहीत असे ती म्हटली.

श्वेता पुढे म्हणाली, आता इतक्या वर्षांनी आपल्या लिखाणाकडे लक्ष देण्याचे मी ठरवले आणि त्यादृष्टीने पुन्हा एकदा लिहायला सुरुवात केली. एका वृत्तपत्रात स्तंभलेखन सुरु केले. मग माझा लिहीण्याचा आत्मविश्वास वाढला. मग पॅराडाईज टॉवर्सचा जन्म झाला. श्वेताच्या या पुस्तकाविषयी दिग्दर्शक करण जोहर याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, पुस्तकात सर्व गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करण्यात आला आहे. त्यातील कथा वेगवान असून ती अतिशय बौद्धिकरित्या लिहीली आहे.