सैराट, फँड्री असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे. विषयातलं वेगळेपण आणि मांडणीतली कल्पकता यामुळं त्याचे चित्रपट सर्वच वयोगटातल्या लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. नागराजचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
नागराज मंजुळेनं आपल्या सोशल मिडीया हँडलवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या १८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे, ही विशेष बाब. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचं वृत्त आजतकने दिलं होतं. एका वर्षापूर्वी ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. मात्र काही कायदेशीर अडचणींमुळे आणि करोना संकटामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता तो १८ जून २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेने तसंच या चित्रपटाच्या टीमनेही आपल्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.
View this post on Instagram
सैराटमधला परश्या अर्थात आकाश ठोसर यानेही आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे. बॉलिवूडच्या महानायकाचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच. त्यात मराठीतला एक कल्पक दिग्दर्शक आणि संपूर्ण कलाविश्वावर आपल्या संगीताची आणि गीतांची छाप सोडणारे अजय-अतुल. असं हे भन्नाट मिश्रण असल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असेलच यात शंका नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 7:02 pm