देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सध्या जोरात सुरु आहे. अनेक ब़ॉलिवूड सेलिब्रिटीही लस टोचून घेत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या परिवारासह लसीकरणाचा लाभ घेतला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून याबद्दल माहिती दिली आहे.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवरून तसंच ट्विटरवरून लसीकरणाबद्दल माहिती दिली. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन वगळता सर्व परिवाराने लस घेतल्याची माहिती त्यांनी दिली. अभिषेक सध्या कामानिमित्त बाहेर असल्याने त्याने लस घेतली नाही.

गेल्या वर्षी अमिताभ, मुलगा अभिषेक, त्यांची सून, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि नात आराध्या या सर्वांना करोनाची लागण झाली होती. आपल्या टम्बलर अकाऊंटवरून अमिताभ लिहितात,  “झालं….लसीकरण झालं. सगळं ठीक आहे. परिवाराची आणि स्टाफची करोना चाचणी केली. त्याचा अहवाल आला…सगळं ठीक आहे…सर्वजण निगेटीव्ह आहोत, त्यामुळे लगेच लस घेतली. संपूर्ण परिवाराने लस घेतली, अभिषेक मात्र राहिला. तो कामानिमित्त बाहेर आहे, काही दिवसात परत आल्यावर तोही घेईल.”

पुढे ते म्हणतात, “उद्यापासून पुन्हा कामाला सुरुवात…लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर एक सविस्तर ब्लॉग लिहायचा आहे…लिहिन नंतर….ते ऐतिहासिक होतं.”

अमिताभ यांच्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात डोळ्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. ९ एप्रिलला तो प्रदर्शित होणार होता मात्र आता हे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलं आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत इमरान हाश्मी, अन्नू कपूर, रघुबीर यादव, रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूझा हे कलाकार दिसणार आहेत.