बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहिमेत अधिक व्यापक प्रमाणात सहभाग घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, बिग बी आता देशात महिलांसाठी विशेष शौचालये आणि लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे कार्य हाती घेणार आहे. तुमच्या घरी, गावात आणि कामाच्या ठिकाणी शौचालय बांधा. महिलांसाठीही विशेष शौचालये बांधा. मुलांना लहान वयातच स्वच्छतेचे महत्त्व समजवून सांगा. जर लहान वयात एखादी गोष्ट शिकवली तर, आयुष्यभर मुले त्याचे पालन करतील, असे अमिताभ यांनी ट्विटरवरून सांगितले. काही दिवसांपूर्वीच बच्चन यांनी हातात झाडू घेऊन जुहू येथील आपल्या ‘जलसा’ निवासस्थानाजवळील परिसरात साफसफाई केली आणि नागरिकांनाही स्वच्छतेचा संदेश दिला होता. अमिताभ हे युनिसेफ संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मुलन मोहिमेचेही सदिच्छा दूत आहेत. स्वतःला स्वच्छतेची सवय लावा, मग इतरांना तो संदेश द्या. एखादी चांगली गोष्ट हाती घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला टीका आणि उपहासाचा सामना करावा लागेल. परंतु त्यातून साध्य होणारा परिणाम टीकाकारांची तोंडे बंद करील. मी अनेकदा असे केले असून, याचा दाखला द्यायचा झाल्यास पोलिओ निर्मुलन मोहीमकडे पाहता येईल. प्रत्येकाला स्वच्छतेचा समान हक्क आहे. कृपया शौचालयांचा वापर करताना तरी उच्च-नीच असा भेद करू नका. याबाबत सगळ्यांना समान वागणूक द्या, असा संदेश अमिताभ यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.