बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. नुकताच अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो शेअर करत ‘चुपके चुपके’ चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये बिग बींचा ‘जलसा’ हा बंगला दिसत आहे. या आलिशान बंगल्यामध्ये अनेक हिट चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

अमिताभ बच्चन यांनी कॉमेडी चित्रपट ‘चुपके चुपके’मधील एक सीन जया बच्चन यांच्यासोबत शेअर केला होता. तेव्हाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो अमिताभ यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा जलसा हा बंगला देखील दिसत आहे. अमिताभ यांनी पोस्टमध्ये जलसा हे घर कसे खरेदी केले याबाबत देखील खुलासा केला आहे.

आणखी वाचा: लाइमलाइटपासून दूर असलेली सैफची अविवाहित बहिण आहे इतक्या कोटींची मालकीण

‘चुपके चुपके, ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत केलेल्या या चित्रपटाला आज ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या फोटोमध्ये जे घर दिसत आहे ते निर्माते एनसी सिप्पी यांचे घर होते… मी ते खरेदी केले होते पण नंतर विकले. काही दिवसांनंतर ते घर मी पुन्हा खरेदी केले… घरामध्ये थोडे फार बदल केले.. आता हे घर जलसा म्हणून ओळखले जाते. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. आनंद, नमकहराम, चुपके चुपके, सत्ते पे सत्ता आणि इतर बरेच चित्रपटांचे येथे चित्रीकरण झाले आहे’ या आशयाचे कॅप्शन बिग बींनी दिले आहे.

अमिताभ आणि जया बच्चन यांनी ‘जीर’, ‘अभिमान’, ‘चुपके-चुपके’, ‘मिली’, ‘शोले’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

अमिताभ यांचा लवकरच ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.