बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. ‘एएनआय’ने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. शनिवारी(११ जुलै) बिग बींनी ट्विट करुन त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या माहितीनंतर चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

अमिताभ बच्चन यांनी रात्री उशीरा ट्विट करुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांच्या कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, जया बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र अभिषेक बच्चनचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याचं पाहायला मिळालं. सध्या बिग बींप्रमाणेच त्याच्यावरही नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे”, असं नानावटी रुग्णालयाकडून माहिती मिळाली आहे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टची प्रतीक्षा
करोनाची लागण झालेल्या व्यक्तीची आरटी पीसीआर टेस्ट करणं गरजेचं असतं. त्यामुळे सध्या अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची दुसरी म्हणजे आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. परंतु, अद्याप त्याचे रिपोर्ट आलेले नाहीत. या टेस्टचे रिपोर्ट २४ तासांनंतर येतात. त्यामुळे सध्या सगळेच जण या रिपोर्टसची प्रतीक्षा करत आहेत.

बिग बींच्या घराचं होणार सॅनिटायजेशन
बिग बी आणि अभिषेकला करोना झाल्याचं समोर आल्यानंतर आता त्यांच्या संपूर्ण घराचं सॅनिटायजेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेद्वारे बिग बींच्या जलसा आणि प्रतीक्षा या दोन्ही बंगल्यांचं सॅनिटायजेशन होणार आहे.