बिग बींच्या चाहत्यांसाठी यावेळी त्यांचा वाढदिवस विशेष महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी बॉलिवूडचे महानायक ७५ वर्षांचे होणार आहेत. ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला जाणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळत होत्या. मात्र या सर्व चर्चा खोट्या आणि निराधार असल्याचं बिग बींनी स्पष्ट केलंय.

‘मोठमोठी बातमीपत्रं, इंटरनेट आणि इतर माध्यमांतून मला वाचायला मिळतंय की माझा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला जाईल, या सर्व बातम्या निराधार आहेत,’ असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलंय. यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, ‘माझ्या ७५ व्या वाढदिवसाच्या मोठं सेलिब्रेशन होणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. जर कोणी लपूनछपून तशी तयारी करत असल्यास मी हे स्पष्ट करतो की मी तिथे जाणार नाही.’

वाचा : हिनाच्या अशा वागणुकीमुळे तिच्या घरचेही पडले पेचात

ट्विटरशिवाय त्यांनी आपल्या ब्लॉगमध्येही या सर्व चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय. ‘माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अनेक योजना आखल्या जात आहेत. यादिवशी कोणत्याही प्रकारची पार्टी किंवा मोठ्या समारोहाचं आयोजन व्हावं अशी माझी इच्छा नाही. कोणी अशा प्रकारच्या पार्टीची तयारी करत असल्यास त्यांनी ते रद्द करावं. कारण मी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाची परवानगी देणार नाही, मग ते कुटुंबिय असोत किंवा इतर कोणी व्यक्ती,’ असं आवाहन त्यांनी आपल्या ब्लॉगमधून केलंय.

याआधीही बिग बींनी त्यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारच्या सेलिब्रेशन करण्याला विरोध केला होता. धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणे त्यांना आवडत नाही. मात्र यादिवशी प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांशी ते आवर्जून संवाद साधतात.