नरगिसपासून करीना कपूरपर्यंत आणि दिलीप कुमार यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत बॉलिवूड कलाकारांचे मेकअप करणारे प्रसिद्ध रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन इंडस्ट्रीत काम करणारे पंढरी जुकर हे पंढरीदादा म्हणून ओळखले जायचे. आपल्या आयुष्याची साठ वर्षे त्यांनी या इंडस्ट्रीला दिली होती. कृष्णधवलपासून ते रंगीत चित्रपटांपर्यंत पंढरीदादांनी आपल्या मेकअपची किमया दाखवली होती. पंढरीदादांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वात शोककळा पसरली. बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी यांनी त्यांच्याशी संबंधित एक आठवण सोशल मीडियावर सांगितली.

अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तान’ याची शूटिंग गोव्यात सुरू होती. चित्रपटातील भूमिकेनुसार बिग बींना दाढी लावायची होती. एकेदिवशी बिग बींच्या मेकअपनंतर पंढरीदादांना काही कामानिमित्त गोव्याहून मुंबईला परतावे लागले होते. तेव्हा पंढरीदादा पुन्हा गोव्यात येईपर्यंत आठवडाभर बिग बींनी तोंड धुतलं नव्हतं. चेहऱ्याचा मेकअप जसाच्या तसा ठेवून, अगदी चूळही न भरता त्यांनी सात दिवस शूटिंग केलं होतं.

यशराज फिल्म्स आणि पंढरीदादांचं नातं फार जुनं होतं. एका मुलाखतीत यश चोप्रा पंढरीदादांची स्तुती करत म्हणाले होते, “एखाद्याच्या चेहऱ्य़ाला पडद्यावर चमकावणं म्हणजे मेकअप नाही. व्यक्तीच्या मनाची सुंदरता चेहऱ्यावर आणण्याचं काम म्हणजे मेकअप आणि हे काम ब्लॅक अँड व्हाइटपासून रंगीत चित्रपटांपर्यंत अत्यंत खुबीने कोणी करू शकतं तर ते होते पंढरीदादा.”

राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर यांचाही मेकअप पंढरीदादांनी केला होता. रंगभूषा म्हणजे फक्त चेहऱ्याला रंग लावणं नाही तर त्यात पात्राचं व्यक्तिमत्त्व रंगभूषेतून उभं राहिलं पाहिजे असं पंढरीदादा नेहमी सांगत असत.