महानायक अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री एक भावनिक ट्विट केलं. राजस्थानमधील जोधपूर येथे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्याच्या तब्येतीबद्दल अनेकजण काळजी व्यक्त करत विचारपूस करत होते तेव्हा मध्यरात्री अमिताभ यांनी एक भावनिक ट्विट केलंय.

‘कुछ कष्ट बढ़ा
चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा ;
इलाज प्रबल ,
स्वस्थ हुए नवल ,
चलो इसी बहाने , अपनों का पता तो चला’ असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी रात्री साडेतीनच्या सुमारास केलं. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चं चित्रिकरण सुरू असताना अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून डॉक्टरांची एक टीम खासगी विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली होती. ‘अमितजींच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. ते बरे आहेत. त्यांना पाठ आणि मानदुखींमुळे हा त्रास झाला होता. चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेल्या कपड्यांचे वजन जास्त असल्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. इतर कोणतेही गंभीर कारण नसून, त्यांची प्रकृती उत्तम आहे’ असं सांगत जया बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

पण अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री केलेल्या भावनिक ट्विटमुळे अनेक चाहत्यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं निधन झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांनी भावनिक ट्विट करत एक एक करून सगळेच सोडून जात असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होतं.