मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी ‘ या मराठी चित्रपटाच्या पहिल्या चित्रीकरणात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे विक्रम गोखलेंसोबत त्यांची महत्त्वाची दृश्ये आहेत. २० मेपासून या चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरु झाले. मुंबई आणि पुणे येथे या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण होईल. या चित्रपटात दोन गाणीही आहेत.

यापूर्वी अमिताभ यांनी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित ‘आक्का’ ( १९९४) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. आता पंचवीस वर्षांनी बिग बी मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यानंतर उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ (२००९) या मराठी चित्रपटाची निर्मिती अमिताभ यांच्या ‘ए बी सी एल’ या कंपनीच्या वतीने करण्यात आली. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या सेटवर आल्याने सेटवरचे वातावरण प्रफुल्लित झाले.

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यामध्ये विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील.