करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेकांना ऑक्सिजन, औषधे आणि बेड मिळत नाही आहेत. अशातच अनेकजण गरजूंच्या मदतीला धावून आले आहेत. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी करोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात देशाची मदत केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी दिल्ली कोविड सेंटरसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत, ‘अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करुन विचारणा करत असतात’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मदतीचे नाटक करण्यापेक्षा…’, अक्षयला ट्रोल करणाऱ्यावर भडकली ट्विंकल

त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. ‘तुम्ही पैशाची चिंता करू नका… जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा! असे ते मला नेहमी सांगतात. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज्यात करोना संसर्ग अद्याप वाढत असला तरी, रूग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६० हजार २२६ रूग्णांनी करोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८६.४ टक्के एवढे झाले आहे. तर, आतापर्यंत राज्यात ७५ हजार ८४९ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.