आजकाल चाहते सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढून आपली इच्छा पूर्ण करतात. पण एक काळ असाही होता जेव्हा चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीमागे ऑटोग्राफ घेण्यासाठी पळायचे, त्यांची तासनतास वाट पाहायचे. ऑटोग्राफची क्रेझ सध्या त्यामानाने फार कमी झालीये. ऑटोग्राफची जागा आता सेल्फीने घेतली आहे. पण, या ऑटोग्राफचा एक किस्सा सध्या अनेकांनाच थक्क करतोय.

सध्याच्या घडीला बॉलिवूडचे ‘शहनशाह’ अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. मात्र एकेकाळी बिग बी एका व्यक्तीची झलक पाहण्यासाठी आतूर असायचे. ही व्यक्ती म्हणजे अभिनेते दिलीप कुमार. अमिताभ बच्चन लहानपणापासूनच त्यांचे चाहते आहेत. १९६० मध्ये बिग बींनी पहिल्यांदा दिलीप कुमार यांना पाहिलं आणि त्यांना पाहताच ते स्टेशनरी दुकानात पळाले. दुकानातून त्यांनी ऑटोग्राफसाठी एक वही विकत घेतली. ही वही घेऊन बिग बी दिलीप कुमार यांच्याकडे ऑटोग्राफ घेण्याासाठी पोहोचले. दोनदा बोलावल्यानंतरही दिलीप कुमार यांच्याकडून कोणतंच उत्तर न मिळाल्याने बिग बी निराश झाले.

हा किस्सा बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्येही मांडला. ‘दिलीप साहब यांनी ना माझ्याकडे आणि ना माझ्या वहीकडे पाहिलं. थोड्या वेळानंतर ते तेथून निघून गेले. कदाचित त्यांनी माझ्याकडे पाहिलं नसावं, असं मला माझ्या कुटुंबियांनी समजावण्याचा प्रयत्न केला,’ असं त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटलंय.

वाचा : करणने काजोलसाठी लिहिला माफीनामा

चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर बिग बींनी दिलीप कुमार यांच्यासोबत ‘शक्ती’ चित्रपटात भूमिका साकारली. मात्र काही कारणांमुळे तेव्हाही त्यांना ऑटोग्राफ घेणं जमलं नाही. अखेर २००६ मध्ये वडाळा येथील आयमॅक्स चित्रपटगृहात बिग बींच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या प्रिमिअरला दिलीप कुमार उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांना एक पत्र दिलं. या पत्रातून त्यांनी बिग बींच्या अभिनयाची प्रशंसा केली होती आणि त्याखाली त्यांची स्वाक्षरीही होती. अशा प्रकारे दिलीप कुमार यांचा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना तब्बल ४६ वर्षे वाट पाहावी लागली.