स्टारकिड्सच्या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या म्हणजेच आराध्याविषयीच्याही बऱ्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. तिच्या बर्थडे पार्टीपासून ते अगदी शालेय कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचीसुद्धा नजर असते. अशी ही आराध्या सध्या अनेकांचीच प्रशंसा मिळवून जातेय. तिची प्रशंसा होण्यामागचे कारण आहे, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेननाच्या सोहळ्यात आराध्याने केलेला परफॉर्मन्स सध्या अनेकांचीच मनं जिंकत असून, तिनेसुद्धा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच कलेची वाट धरल्याचे पाहायला मिळते आहे. व्यासपीठावर गाणे सुरु होताच, ठेका न चुकवता अगदी शिकवल्याप्रमाणेच आराध्या मोठ्या आत्मविश्वासाने नाचत होती. मुख्य म्हणजे या गाण्याच्या शेवटी तिच्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. प्रेक्षकांची गर्दी असूनही ती ज्या अंदाजात परफॉर्म करत होती, ते पाहता बिग बींच्या नातीला पाहून तुम्हीही ‘क्या बात’, म्हणाल, असेच म्हणावे लागेल. खुद्द बच्चन कुटुंबीयांनाही तिचा फार अभिमान वाटत असेल यात शंकाच नाही. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताला बिग बींनी आराध्याचा उल्लेख ‘कलाकार’ म्हणून केला होता. आपल्या कुटुंबात आता आराध्याही कलाकारांच्याच पावलावर पाऊल ठेवतेय, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हा तिचा हा परफॉर्मन्स बिग बींच्या वक्तव्याला अगदी सार्थ ठरली हेच खरे.

या खास दिवशी आपल्या मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि वृंदा राय यांनी हजेरी लावली होती. बच्चन कुटुंबीयांव्यतिरिक्त इतरही बरेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या मुलांच्या शालेय कार्यक्रमासाठी आले होते. या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान, हृतिक रोशन, लारा दत्ता, सोनू निगम, रविना टंडन यांचा समावेश आहे. शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या कार्यक्रमातील काही फोटोही शेअर केले. अब्रामच्या शालेय कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणही गतकाळातील आठवणींमध्ये रममाण झाल्याचे किंग खानने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…