बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी करोनावर मात केली आणि तब्बल २३ दिवसांनंतर त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ‘अमूल’ने बिग बींसाठी खास कार्टून प्रसिद्ध केलं. बिग बींनीसुद्धा इन्स्टाग्रामवर ते कार्टून शेअर करत अमूलचे आभार मानले. मात्र या कार्टूनसाठी बिग बींनी पैसे नक्कीच घेतले असणार असा आरोप एका नेटकऱ्याने केला. त्याला बिग बींनी ब्लॉगच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘अमूलने मोफत हे कार्टून बनवलं नसेल. काहीतरी रक्कम घेतलीच असेल. दरवर्षी ही रक्कम वाढतच असणार’, असा आरोप एका नेटकऱ्याने केला. त्यावर बिग बींनी लिहिलं, ‘तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. जर तुम्हाला सत्य माहित नसेल तर स्वत:च्या स्वच्छ तोंडाला स्वच्छच ठेवावं. या कार्टूनसाठी मी कधीच अमूलला विनंती केली नाही आणि करतही नाही. बाण सोडण्याआधी नीट विचार करावा नाहीतर ते बाण पुन्हा तुमच्यावरच येऊन पडेल. जसं की आता झालंय. माझ्या सभ्य संस्कारांनी त्याचं वर्णन करण्यास थांबवलं आहे.’

https://www.instagram.com/p/CDbvIpIB8ME/

११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल २३ दिवसांनी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन अजूनही रुग्णालयातच आहे.