बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ‘टीई३एन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली. सुदैवाने दुखापत गंभीर नसून काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे खुद्द अमिताभ यांनी ट्विटरवरून सांगितले आहे. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांच्या ‘टीई३एन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अमिताभ यांच्या बरगड्यांना दुखापत झाली. किरकोळ दुखापत असली तरी श्वास घेताना छाती दुखत असल्याचे अमिताभ म्हणाले. आईस-पॅक आणि पेन-किलर्सने दुखणे कमी झाले असून, डॉक्टरने ४८ तासांत दुखापत पूर्णपणे बरी होईल असे सांगितल्याची माहिती अमिताभ यांनी दिली आहे. तसेच डॉक्टरांनी सुचविल्यास एक्स-रे किंवा एमआरआय करणार असल्याचेही अमिताभ पुढे म्हणाले.
दरम्यान, दुखापत झाली असली तरी चाहत्यांनी निश्चिंत राहण्याचे अमिताभ यांनी सांगितले. तसेच वझीर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायंकाळी कोलकाताच्या ‘साऊथ सिटी मॉल’मध्ये जाणार असल्याचेही अमिताभ म्हणाले.