हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अमिताभ बच्चन यांच्या नावे शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार अमिताभ यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) मेलबर्न येथील ला ट्रोब विद्यापीठाकडून उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी रोशन कुमार या भारतीय विद्यार्थ्याला ‘श्री. अमिताभ बच्चन’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. विद्यापीठातील पीएचडी दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. मिडीया, डिजीटल तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दर चार वर्षांनी ला ट्रोब विद्यापीठातर्फे ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. या सोहळ्यानंतर ला ट्रोब विद्यापीठाचे कुलगुरू जॉन देवार यांनी विद्यापीठात संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याला अमिताभ बच्चन यांची उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.