आज २३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. पण काही कारणास्तव अमिताभ हे या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. खुद्द अमिताभ यांनी सोशल मीडियाद्वारे ते या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले होते.

अमिताभ यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणे शक्य होणार नव्हते. ‘मला ताप येत आहे. त्यामुळे मला प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मी दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही’ असे त्यांनी ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी अमिताभ यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले होते.

आणखी वाचा – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातही ‘अंधाधून’ सरस; किर्ती सुरेश ठरली सर्वोकृष्ट अभिनेत्री

आता अमिताभ यांना दादा साहेब फाळके हा पुरस्कार २९ डिसेंबर रोजी देण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहिर केले आहे.