|| तेजश्री गायकवाड

बॉलीवूडचा शहेनशाहा अर्थात अमिताभ बच्चन. अमिताभ यांचे सिनेमे जेवढे प्रसिद्ध तेवढाच त्यांनी सूत्रसंचालन केलेला ‘कौन बनेगा करोडपती’सारखा शोही प्रसिद्ध आहे. किंबहुना, त्यांनी हा शो इतका उंचीवर नेऊन ठेवला आहे की त्यांच्याशिवाय हॉट सीटवर कोणी बसले आहे, अशी कल्पना सध्या तरी त्यांच्या चाहत्यांना करणं अशक्य आहे. ‘देवियो और सज्जनो’ असं म्हणत अमिताभ बच्चन शोची सुरुवात करतात तेव्हा त्यांचे बोलणे, त्यांची केसांची स्टाइल, त्यांचे कपडे सगळ्याच गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. अमिताभ यांच्या कपडय़ांची स्टाइलही नेहमीच हटके असते. त्यांच्या या स्टायलिश आणि हटके लूकमागे प्रिया पाटील हे एक मराठमोळं नाव आहे.

अनेक वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शो ‘कौन बनेगा करोडपती’चा नवीन सीजन लवकरच दाखल होणार आहे. ‘केबीसी’च्या मंचावर यंदा अमिताभ नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या लूकमागचा चेहरा असलेली प्रिया गेली ७ वर्ष ‘केबीसी’च्या निम्मिताने अमिताभ यांच्याबरोबर काम करते आहे. तिने तिच्या प्रवासाची सुरुवात टेक्सटाइल आणि फॅशनचा अभ्यास करूनच केली. प्रियाने २००० साली ‘निफ्ट’मधून फॅशन डिझाइनिंगचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर तिने युकेमध्ये फॅ शन आणि टेक्सटाइलचा एक कोर्स पूर्ण केला. लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड असणारी प्रिया तिची लहनपणीची आठवण सांगते, मी लहानपणी माझ्या बाहुल्यांसाठी कपडे बनवायचे. तेव्हाच माझ्या आईने तू मोठी झाल्यावर मोठय़ांसाठी कपडे बनवू शकतेस. त्याचं शिक्षण घे, असं सांगितलं होतं. खरंतर आईच्या या सल्ल्यापासूनच माझ्या या क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रियाने काही काळ दुसऱ्या देशातच, पण भारताकडून एका फॅशन हाऊसमध्ये काम केले. त्याच वेळी तिने स्वत:ची फॅशन अ‍ॅक्सेसरीजची लाइन सुरू केली. तेव्हा तिने तिथे एका स्पर्धेसाठी  खास स्कार्फ  डिझाइन केले होते. त्यात ती जिंकलीही. तिने डिझाइन केलेले स्कार्फ तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी चेरी ब्लेअर यांनी घातला होता, अशी एक गोड आठवण प्रियाने सांगितली. त्यानंतर २००७ साली ती भारतात परत आली. ‘मी भारतात परत आल्यापासून रिअ‍ॅलिटी शोज करत होते. मी ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’, ‘क्या आप पाचवी पाससे तेज है’, ‘सच का सामना’ आणि ‘केबीसी’ अशा अनेक शोजसाठी मी स्टायलिट म्हणून काम करायला लागले’, असं ती सांगते. प्रियाने ज्या काळात फॅ शन डिझाईनिंगची पदवी घेतली होती, त्या वेळी फॅशन इंडस्ट्री भारतात नुकताच जम बसवू लागली होती. ‘लॅक्मे फॅशन वीक’ सारखे मोठे शोज नुकतेच येऊ लागले होते, असं प्रिया सांगते. त्यामुळे कुठेतरी डिझायनर, स्टायलिस्ट यांना कामासाठी व्यासपीठ मिळायला सुरुवात झाली होती. त्यावेळी डिझाईनिंगचं शिक्षण घेतल्यानंतर स्वत:चं बुटिक सुरू करायचं आणि घरसंसाराचं बस्तान बसवायचं, असाच विचार केला जायचा. यापलीकडेही फॅशन इंडस्ट्रीमध्ये बदल होऊ  लागले होते. आजघडीला समाजमाध्यमांमुळे करिअर करायला सोपं जातं आहे, तुम्ही अगदी एका रात्रीत या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवू शकता, असं ठाम मत तिने व्यक्त केलं.

अमिताभ यांची स्टायलिस्ट म्हणून काम करता करता प्रियाने मागच्या सीझनपासून त्यांची डिझाइनर म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या लूकबद्दल आणि कामाबद्दल प्रिया सांगते, ‘मी सात वर्ष अमिताभ यांच्याबरोबर ‘केबीसी’साठी त्यांची स्टायलिस्ट म्हणून काम केलं. तेव्हाही खूप मेहनत घेऊ न कोणत्या डिझाइनरचे कपडे त्यांना छान वाटतील, कोणता लूक आपण करू शकतो यावर काम करत होते. पण गेल्या वर्षीपासून अमिताभ यांनीच शोव्यतिरिक्त त्यांच्यासाठी कपडे डिझाइन करण्याविषयी सुचवलं, असं तिने सांगितलं. गेल्या वर्षी थ्री पीस सूटची स्टाइल आम्ही केली होती. त्यांची खूप चर्चाही झाली. यावर्षी आम्ही त्यांच्या लूकमधील महत्त्वाचा भाग असलेल्या टायवर वेगवेगळे प्रयोग करणार आहोत, असे तिने सांगितले.

बिग बींसाठी तयार के ल्या जाणाऱ्या कपडय़ांसाठी कापडाचे अनेक प्रकार आम्ही खास इटलीवरून मागवतो. त्यांच्या सूटवर लावली जाणारी बटणंसुद्धा दुसऱ्या देशातून आणली जातात. यासाठी मी आणि माझी टीम खूप मेहनत घेतो. आणि या सगळ्या नवनवीन प्रयोगांना अमिताभ यांच्याकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो, असं ती आवर्जून सांगते. अमिताभ यांना त्यांच्या लूकमध्ये प्रयोग करायला खूप आवडतं. ‘केबीसी’ हा शो संध्याकाळी असतो, त्यामुळे संध्याकाळी सूट होतील असेच रंग आम्ही वापरतो. त्यांना बराच वेळ तिथे बसून शो करायचा असतो, त्यामुळे त्यांचे कपडे आरामदायी असावेत, यावरही आमचा भर असतो, असं सांगणाऱ्या प्रियाने मागच्या सीझनमध्ये अमिताभ यांना टायवरती ब्रोच लावायची कल्पनाही दिली होती. ‘टायवर ब्रोच लावण्याचा तसा काही प्रकार बाजारात उपलब्ध नव्हता, म्हणून मग मी स्वत: सुरुवातीला ते तयार केले होते. तेव्हा ती फॅशन स्टेटमेंट ठरली’, असं ती सांगते. डिझाइनर म्हणून माझे कपडे अमिताभ नेहमीच उत्तमपणे सादर करू शकतात, असं आपल्याला कायम वाटत आलं असल्याचं ती विश्वासाने सांगते.

अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’च्या लूकमागे प्रिया आहे हे अमिताभ यांनी केलेल्या एका ट्विटमुळे देशभर वेगाने पसरले. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, असं ती सांगते. ‘त्यादिवशी मी एका कार्यक्रमासाठी श्रीलंकेला जाणार होते. तेव्हा मला अमिताभ यांनी ट्विट केलं आहे याची कल्पनाच नव्हती. आदल्या दिवशी आमचं चित्रीकरण उशिरा संपल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठले होते. त्यानंतर माझ्या फेसबुक, ट्विटर अशा सगळ्याच ठिकाणी अभिनंदनाचा पाऊस पडला होता. त्यादिवशी मी विमानतळावर बसून प्रत्येकाचे मनापासून आभार मानले होते. समाजमाध्यमांवर कधीच इतकी सक्रिय नसणारी मी अमिताभ यांच्या एका ट्विटमुळे आता व्यवस्थित सक्रिय झाले आहे’, असं प्रिया सांगते.