बॉलिवूड अभिनेता बिग बी अर्थात अमिताभ बच्चन या नावाचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांची लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांना आज बिग बी, महानायक अशा असंख्य नावाने चाहते प्रेमाने हाक देतात. मात्र अमिताभ बच्चन ते बॉलिवूडचा महानायक होण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांना मेहमूद यांची साथ मिळाली. उत्तम अभिनयामुळे बिग बींनी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलंच. पण, मेहमूद यांच्या चित्रपटात झळकल्यानंतर अमिताभ बच्चनचा महानायक झाला, असं बिग बींनी एका मुलाखतीत सांगितलं.

बॉलिवूडमधील किंग ऑफ कॉमेडी मेहमूद यांचे पडोसन, बॉम्बे टू गोवा, कुवारा बाप, गुमनाम असे अनेक चित्रपट त्याकाळी तुफान गाजले. मेहमूद जितके जबरदस्त अभिनेता होते तितकेच उत्तम दिग्दर्शकही होते. बॉलिवूडचे महानायक यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात मेहमदू यांच्यामुळेच झाली होती. १९६९ साली अमिताभ बच्चन स्ट्रगल करत असताना मेहमूद यांनी अमिताभ यांना आपल्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली होती. हा पहिलाच चित्रपट होता, ज्यात बिग बींनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. जबरदस्त विनोदाने भरलेल्या या चित्रपटाने कमाल केली. हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर अमिताभ यांना मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळू लागली. हा किस्सा स्वत: अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.

दरम्यान, मेहमूद यांचा आज वाढदिवस त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना सध्या चाहते उजाळा देताना दिसून येत आहे. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकिजमध्ये काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मेहमूद घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रोज मालाड ते विरार दरम्यान लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकायचे. मेहमूद यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. वडिलांच्या ओळखीमुळे त्यांना १९४३ मध्ये बॉम्बे टॉकिजच्या ‘किस्मत’ मधून नशीब आजमवण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मेहमूद यांनी अशोक कुमार यांच्या बालपणातील भूमिका साकारली होती.