सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर परतले आहेत. करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे ‘केबीसी’च्या या १२ व्या पर्वाचे काम रखडले होते. टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच के बीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रण केले होते. मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणीचे निर्बंधही रद्द केल्याने आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणे अमिताभ यांना शक्य झाले आहे. दरम्यान बिग बींनी सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

‘गुलाबो सिताबो’ डिजिटली प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ के बीसीच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होते. मात्र टाळेबंदीत चित्रीकरणच ठप्प झाल्याने हा शोही रखडला होता. त्यातल्या त्यात घरातूनच चित्रीकरण पूर्ण करत शोचे प्रोमोज तयार करण्यात आले होते. सगळ्या प्रकारची काळजी घेऊन ते चित्रीकरण करण्यात आले होते. सगळंच बंद असताना घरातून प्रोमो चित्रित करणे हा महानायकासाठीही फार सुखद अनुभव नव्हता. मात्र अत्यंत नियोजनबद्ध आणि कष्टपूर्वक दोन दिवसांचे चित्रीकरण आम्ही एका दिवसातच पूर्ण के ले, अशी आठवण के बीसीच्या सेटवर परतलेल्या अमिताभ यांनी समाजमाध्यमांवर सांगितली आहे. दरम्यान, इतर मालिकांच्या चित्रीकरणाला वेग आला असला तरी ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणावर निर्बंध असल्याने अमिताभ यांना घेऊन शोचे चित्रीकरण सुरू करणेच शक्य नव्हते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर के बीसीच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी खूप काळजी घेऊनच चित्रीकरण करावे लागत आहे, असेही अमिताभ यांनी सांगितले.

जुलै महिन्यात अमिताभ यांनाही करोनाची लागण झाली होती. जवळपास चार आठवडे नानावटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २ ऑगस्ट रोजी अमिताभ यांना घरी सोडण्यात आले होते. करोनावर मात करून सेटवर चित्रीकरणासाठी परतलेल्या अमिताभ यांच्यासाठी आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. सुरक्षेसंदर्भातील सगळे नियम काटेकोर पाळूनच चित्रीकरण के ले जात असल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले आहे. ‘के बीसी १२’ या शोबरोबरच रणबीर कपूर आणि अलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही अमिताभ यांची महत्त्वाची भूमिका आहे. याही चित्रपटाचे चित्रीकरण बाकी असून ऑक्टोबर महिन्यात चित्रीकरण पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. आयुष्य आता पुन्हा पहिल्यासारखे जगता येणार नाही, करोनाने सगळेच बदलून टाकले आहे, अशी भावनाही अमिताभ यांनी व्यक्त के ली आहे.