बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ते त्यांचे विचार, मत किंवा एखादा निर्णय ट्विटरवर सांगत असतात. यामध्येच त्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. बिग बींनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांनी सोशल मीडियावर वैद्यकीय प्रमाणपत्र शेअर करत त्यांच्याकडे मदत मागितली आहे.

विविध मार्गाने गरजुंची मदत करणाऱ्या बिग बींनी थेट अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्या ते चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मी अवयदान करण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ट्विट बिग बींनी केलं आहे. मात्र या ट्विटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र, तुम्ही अवयदान करु शकत नाही असं म्हटलं आहे.


“सर, तुम्हाला हिपेटाइटिस-बी होता. त्यामुळे तुमचं अवयव अन्य कोणत्याही व्यक्तीला दान करता येणार नाही. तसंच तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट केलं आहे. तुम्ही अवयवदान करण्याचा खरंच छान निर्णय घेतला आहे. पण क्षमस्व. तुम्हाला अवयवदान करता येणार नाहीत”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, बिग बींनी अवयवदान करण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र कमेंट बॉक्समध्ये शेअर केलं आहे. सोबतच बिग बींकडे मदतीची मागणी देखील केली आहे.