शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वीरपत्नी आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची बिग बी आर्थिक मदत करणार आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी १ कोटी रुपये आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत बिग बी करणार आहेत.

ही मदत योग्यप्रकारे गरजूंपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी स्वत: एक टीम तयार केली आहे. त्या त्या लोकांपर्यंत हे पैसे पोहोचावेत आणि वितरणाचे काम कोणत्याही अडथळ्यांविना व्हावं यासाठी ही टीम काम करणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या मते शेतकरी आणि देशाचे जवान हे समाजाचे असे घटक आहेत ज्यांना कधीच दुर्लक्षित करू नये. याआधीही त्यांनी आंध्र प्रदेश आणि विदर्भातील काही शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी यासाठी मदत केली होती. परोपकारी कार्यासाठी बिग बी नेहमीच पुढे सरसावतात. पोलिओ निवारण, क्षयरोगाबाबत जनजागृती आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.