आतापर्यंत आपण राष्ट्रगीत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत, अनेक गायकांच्या आवाजात ऐकले आहे. पण यावेळी ज्या पद्धतीने राष्ट्रगीत सादर केले गेले आहे, ते ‘पाहून’ तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी राष्ट्रगीताचा हा व्हिडिओ प्रदर्शित केला. या व्हिडिओमध्ये बिग बी दिव्यांग मुलांसोबत सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करताना दिसत आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन ‘अर्धसत्य’ आणि ‘आक्रोश’ सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या गोविंद निहलानी यांनी केले आहे. व्हिडिओमध्ये लाल किल्लाही दिसतोय. या खास मुलांसोबत अमिताभ यांना राष्ट्रगीत गाताना पाहून मन भारावून जाते.

या व्हिडिओच्या प्रदर्शनावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुदेश वर्माही उपस्थित होते. या व्हिडिओला गोवा, भोपाळ, चंदीगढ आणि कोल्हापुरमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रगीतामध्ये दिव्यांग आणि विकलांग मुलांना ते कोणापेक्षाही कमी नाही ही जाणीव करून देण्यासाठीच त्यांची निवड करण्यात आली असे मानव संसाधन विकास राज्य मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते आदित्य चोप्रा यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत आमिर खान, कतरिना कैफ आणि ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्यावर्षी दिवाळीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ऋषी कपूर यांच्यासोबत ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमातही ते दिसणार आहेत. तसेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९ व्या पर्वाचे सुत्रसंचालन ते करणार आहेत.