बॉलिवू़डचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच्या अभिनयाने साकार होणाऱ्या आगामी चित्रपटात आता महानायक अमिताभ बच्चन दिसणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आयान मुखर्जी यांच्या आगामी ‘ड्रॅगन’ चित्रपटामध्ये अमिताभ आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अमिताभ खास पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. अमिताभ यांनी चित्रपटामध्ये काम करण्याची तयारी दर्शविली आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असले तरी, चित्रपटातील त्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी रणबीरचे वडिल म्हणजेच ऋषी कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. ‘अमर अकबर अॅन्थॉनी , ‘कुली’, ‘नसीब’ आणि ‘अजूबा’ या चित्रपटामध्ये अमिताभ आणि ऋषी कपूर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र रणबीरसोबत ते या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा काम करताना दिसणार आहेत.  ‘जवानी दिवानी’ या चित्रपटानंतर आयान मुखर्जी रणबीरसोबत ड्रॅगन हा तिसरा चित्रपट करत आहे.कथानकामधील व्यक्तिरेखेला न्याय देवून प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दिग्दर्शक मुखर्जी यांच्यासह अभिनेता रणबीर कपूर मेहनत घेताना दिसत आहे. या अॅक्शन चित्रपटातील स्टंटसाठी रणबीर विशेष प्रशिक्षण घेतानाची काही छायाचित्रे यापूर्वी समोर आली होती. ज्यामध्ये शारिरिक तंदुरुस्तीसह कथानकाला आवश्यक असणाऱ्या स्टंट करण्यासाठी रणबीर मेहनत घेताना दिसला होता. स्टंटचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात दमदार अभिनय साकारणारी आलिया भट्ट ‘ड्रॅगन’ या चित्रपटात रणबीरसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपट सुपर पॉवरची अनुभूती देणारा असल्याचे सांगत चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिक माहिती देण्यास रणबीरने मौन बाळगले आहे.

यासोबतच संजय गुप्ता याच्या आगामी चित्रपटातील मुख्य भूमिकेमध्ये रणबीर कपूर दिसणार असल्याची देखील चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगताना दिसत आहे. ‘बिगडे नवाब’ नावाच्या चित्रपटात रणबीर दिसणार असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांच्या आतापर्यंतच्या चित्रपटासारखा असणार आहे, अशी चित्रपटाविषयीची ओझरती माहिती देखील यावेळी संजय गुप्ता यांनी दिली होती. रणबीरकडून या चित्रपटाला होकार मिळाल्यानंतर चित्रपटातील अन्य पात्रांचा विचार केला जाईल अशी चर्चा बॉलिवूड जगतात सुरु असून रणबीरसोबतच्या या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीला संजय गुप्ता पसंती देईल, हे पाहणे देखील उत्सुकतेचे असणार आहे. रणबीर कपूर आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटामध्ये कतरिनासोबत झळकणार आहे.