शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा टिझर अभिनेते अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला. यावेळी महानायक बच्चन यांनी बाळासाहेबांसोबतच्या कौटुंबिक आठवणींनाही उजाळा दिला. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातानंतर शिवसेनेच्या रुग्णवाहिकेच्या झालेल्या मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यावेळी जर शिवसेनेची रुग्णवाहिका वेळेवर आली नसती तर माझी प्रकृती आणखी गंभीर झाली असती, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

वाचा : ‘बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील’

जुलै १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटातील एक साहस दृश्य करताना अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर बंगळुरुमध्ये उपचार सुरू होते. पण, त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात हलवण्यात आलं होतं. या संपूर्ण घटना आठताना बच्चन म्हणाले ‘अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. ‘कुली’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. पुढील उपचारासाठी मला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं होतं. मी बेशुद्ध अवस्थेत होतो. पावसाचे दिवस होते. मुंबईत मुसळधार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन मला थेट ब्रीच कँडी रुग्णालयात नेलं जाणार होतं. मुसळधार पावसामुळे एकही रुग्णवाहिका मला नेण्यासाठी उपलब्ध नव्हती. त्यावेळी शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कँडीला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती.’ असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांचे आभार मानले.

बाळासाहेबांबद्दल अनेक आठवणी अमिताभ बच्चन यांनी जागवल्या. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र हे तीन तासांमध्ये साकरणं जवळपास अशक्य आहे, तेव्हा त्यांच्या जीवनावर दहा -बारा चित्रपटांची मालिकाच तयार करा असे भावोद्‍गार बच्चन यांनी काढले. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी कोणतीही मदत लागली, अगदी माझा वाटा खारीचा असला तरी मी हसत हसत या चित्रपटासाठी वाट्टेल ती मदत करायला  तयार आहे असंही ते म्हणाले.