गांधी-नेहरु आणि बच्चन परिवार यांचा चांगला स्नेह आहे. राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांनी तो पुढे टिकवला. हे दोन्ही परिवार एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होते. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा अमिताभ यांनी निवडणूक लढवली होती. पण पुढे ते राजकारणात राहिले नाहीत. जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण!

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या सांगण्यावरुन अमिताभ यांनी १९८४ साली इलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांना हरवत ते ही निवडणूक जिंकलेही होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला. मात्र त्यानंतरही राजीव यांच्याशी त्यांची मैत्री टिकून राहिली. १९९१ साली राजीव यांची हत्या झाली तेव्हा अमिताभ लंडनमध्ये होते. त्यांच्या हत्येची बातमी ऐकताच ते त्वरीत भारतात परतले आणि त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीसुद्धा घेतली.

राजीव गांधींच्या हत्येच्या साधारण एका वर्षानंतर जेव्हा निवडणुका झाल्या त्या वेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, अमिताभ यांनी सोनिया गांधींच्या मदतीसाठी पुन्हा राजकारणात यावं. पण अमिताभ यांनी त्यावेळी हा प्रस्ताव नाकारल्याचा उल्लेख आढळून येतो. अमिताभ यांचं असं म्हणणं होतं, “माझी सवय आहे की मी जबाबदारी घेतली की ती सर्वस्व देऊन आणि कुठल्याही परिस्थितीत पार पाडतो. मी जेव्हा कमी चित्रपट स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा लोकांना वाटलं असतं की मी राजकारणात येण्यासाठी असं केलं आहे. राजीव माझे चांगले मित्र होते, मी सोनियाजींचाही हितचिंतक आहे आणि त्यांच्या परिवाराच्या निकट आहे. पण मी राजकारणात येण्याने त्यांच्या परिवाराचं दुःख कसं कमी होणार? आणि त्यांना माझ्या मदतीची गरजच का आहे? ते खंबीर आणि समजूतदार आहेत. त्यांना माहित आहे की त्यांना काय करायचं आहे आणि काय नाही.”

अशीही माहिती मिळत आहे की अमिताभ यांनी राजकारणात यावं अशी इंदिरा यांची इच्छा नव्हती. त्यांनी राजीव गांधींना स्पष्ट सांगितलं होतं की अमिताभला कधीही राजकारणात आणण्याचा प्रयत्त्न करु नका.