अमिताभ बच्चन यांच्या ‘युद्ध’ या आगामी मालिकेची सध्या माध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिकेच्या प्रसिद्धीकरिता मंगळवारी अमिताभ यांनी मुंबईच्या शेअर बाजारास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शेअर बाजाराची घंटा वाजवून दिवसाच्या व्यवहारांना सुरुवात करण्यात आली. फॉर्मल सूटमध्ये आलेल्या अमिताभ यांनी सकाळी ९.१५वाजता शेअर बाजाराची घंटा वाजवली. यावेळी बिग बींनी त्यांच्या आगामी ‘युद्ध’ मालिकेच्या पोस्टरचेही अनावरण केले.
अमिताभ हे छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध क्वीज शोचे सूत्रसंचालक राहिले आहेत. या क्वीज शोचे नवीन पर्वदेखील लवकरच सुरु होणार आहे. मात्र, केवळ सूत्रसंचालकाच्या भूमिकेत मर्यादित न राहता अमिताभ छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही पदार्पण करत आहेत. ‘युद्ध’ या आगामी मालिकेत अमिताभ हे युद्धिष्ठिर नावाच्या उद्योजकाच्या भूमिकेत दिसतील. कॉर्पोरेट विश्वातील उद्योजकाचा संघर्ष आणि त्याचवेळी वैयक्ति आयुष्य जपण्यासाठीची लढाई लढणा-या व्यक्तीची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे. के. के. मेनन, नवाजुद्दिन सिद्दीकी आणि अभिनेत्री सारिका यांच्यादेखील या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत.