वयाच्या ७५व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचे चाहते पाहायला मिळतात. त्यांच्या मागून अनेक कलाकार आले आणि स्वत:चं स्थान निर्माण केलं पण बिग बी मात्र आपलं वर्चस्व कायम राखून आहेत. असं असतानाही सध्या त्यांना बॉ़लिवूडमधल्या दोन कलाकारांची खूप भीती वाटते. या दोन्ही महिला कलाकार असून त्यांनी ज्याप्रकारे कमी काळात नाव कमावलंय ते पाहून बिग बींनाही त्यांच्यासोबत काम करण्यास भीती वाटत आहे.
नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही भीती बोलून दाखवली. ‘बॉलिवूडमधील आत्ताचे कलाकार इतके प्रतिभावान आहेत की मलासुद्धा त्यांच्यासोबत काम करण्यास भीती वाटते. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण यांसारख्या अभिनेत्रींचं अभिनय कौशल्य जबरदस्त आहे. त्यांच्यापुढे मी टिकणारच नाही असं वाटतं,’ असं बिग बी म्हणाले.
याविषयी ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्यासारखे अभिनेते मेहनत करत आहेत, प्रयत्न करत आहेत. अजूनही आम्ही एखादा सीन परफेक्ट करू शकत नाही असं वाटतं. पण आत्ताचे कलाकार पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकू लागली आहेत. नेमकं काय करायचं आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्यांच्यातला प्रचंड आत्मविश्वास जाणवतो.’
यावेळी बिग बींनी वरुण धवन आणि रणबीर कपूर या कलाकारांचंही कौतुक केलं. त्याचप्रमाणे ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटातील कार्तिक आर्यन या अभिनेत्याचीही त्यांनी प्रशंसा केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 12:07 pm