छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. अभिनेता अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. त्यामुळे अनेकदा हा शो बिग बींमुळे किंवा या कार्यक्रमातील प्रश्नांमुळे चर्चेत असतो. परंतु, यावेळी हा कार्यक्रम अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भागात गीता गोपीनाथ यांच्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बिग बींनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. त्याचसोबत बिग बींवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

अलिकडेच झालेल्या एका भागात बिग बींनी स्पर्धकाला IMF च्या संशोधन विभागाच्या संचालिका आणि आर्थिक फंडसंबंधित काऊन्सलर यांच्याशी निगडीत एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न विचारतांना त्यांनी गीता गोपीनाथ यांचं कौतुक केलं होतं. मात्र, अनेकांनी बिग बींना ट्रोल केलं आहे. बिग बींनी हे कौतुक करत असताना लिंगभेद केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

‘केबीसी’च्या या भागाचा व्हिडीओ गीता गोपीनाथ यांनी स्वत: त्यांच्या ट्विटरवर शेअर केला होता. तसंच, “हा व्हिडीओ माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मी स्वत: बिग बींची मोठी चाहती आहे”, असं गीता गोपीनाथ यांनी म्हटलं होतं. परंतु, नेटकऱ्यांना ते फारसं रुचलं नाही. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?
या २०१९ पासून कोणत्या संस्थेशी संबंधित मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे? असा प्रश्न बिग बींनी स्पर्धकाला विचारला होता. हा प्रश्न विचारत असताना समोरील स्क्रीनवर गीता गोपीनाथ यांचा मोठा फोटो दाखवण्यात आला होता. हा फोटो पाहून, “यांचा चेहरा इतका सुंदर आहे, की अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांशी यांना कोणी जोडूच शकत नाही”, असं बिग बी म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

‘महिलांच्या कर्तृत्वावर शंका घेणारी ही लिंगभेदाची मनोवृत्ती’ असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर, ‘गीता या येणाऱ्या तरुण पिढीचा आदर्श आहेत त्यांच्याविषयी असं वक्तव्य करणं योग्य नाही’, असं एका युजरने म्हटलं आहे.

वाचा : ‘मिर्झापूर-2’ मागील वादाचं ग्रहण कायम; सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस

कोण आहेत गीता गोपीनाथ ?
गीता गोपीनाथ या भारतीय वंशाच्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत.त्या २०१९ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थजत्ज्ञ म्हणून काम करत आहेत.