अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री शबाना आझमी ही दोन्ही बॉलिवूडमध्ये गाजलेली नावे आहेत. हे दोन्ही दिग्गज नेते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. कसलेले हे दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या दोन्हीही कलाकारांनी एकेकाळी चंदेरी दुनिया जोरदार गाजवली होती. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं आजाद हूं’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांनी एकत्र काम केले होते. तर त्याआधी अमर अकबर अँथनी, परवरीश या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. आता ३० वर्षानंतर ते एका चित्रपटात पुन्हा एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार असून अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित झाले नसल्याचे समजते.

१९८९ नंतर २००७ मध्ये या दोघांनीही ‘ओम शांती ओम’ चित्रपटात एका गाण्यासाठी त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. मात्र ते काम केवळ गाण्यापुरतेच होते. त्यामुळे ३० वर्षांनंतर या दोघांच्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत सैफ अली खान, आदित्य रॉय कपूर, तापसी पन्नूदेखील भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. शबाना आझमी यांनी आतापर्यंत समांतर सिनेमात काम केले आहे. तर अमिताभ बच्चन यांची व्यावसायिक सिनेमातील कारकीर्द जास्त असल्याने हे दोघेही एकत्र येण्याची फारशी वेळ आली नाही. मात्र आता या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटातही अमिताभ बच्चन आपल्याला दिसणार आहेत.