16 October 2019

News Flash

कौतुकास मुकलेल्या ‘बदला’साठी बच्चन यांचे चिमटे!

जगभरातून आजवर १३७.४१ कोटी रुपयांची कमाई; शाहरूखला ‘ट्विटर बोल’ सुनावले..

(संग्रहित छायाचित्र)

जगभरातून आजवर १३७.४१ कोटी रुपयांची कमाई; शाहरूखला ‘ट्विटर बोल’ सुनावले..

मुंबई : बॉलीवूड कलाकारांचे पडद्यामागचे नाते सर्वसामान्यांना फारसे अनुभवता येत नव्हते, मात्र समाजमाध्यमांनी कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील हा दुरावा कमी केला आहे. खुद्द कलाकारही समाजमाध्यमांवर एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधत असल्याने चित्रपटावरून घडलेल्या वा त्यांच्या खासगीतल्या गोष्टीही कधीकधी ऑनलाइन चव्हाटय़ावर येतात. आणि चर्चेचा विषय होतात. सध्या अशीच चर्चा अमिताभ बच्चन यांनी ‘बदला’ चित्रपटावरून शाहरूखला जे ट्विटर बोल सुनावले त्यावर रंगली आहे.

शाहरूख खानच्या रेड चिलीज एण्टरटेन्मेन्टची निर्मिती असलेल्या बदला चित्रपटाने शंभर कोटी रुपये कमाईचा आकडा पार करूनही चित्रपटाच्या वाटय़ाला निर्मात्यांचे कणमात्र कौतुक काही आले नाही, अशी गमतीगमतीत का होईना तक्रोर अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

शाहरूख खानच्या रेड चिलीज एण्टरटेन्मेन्टच्या बॅनरखाली निर्मिती केलेला सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ चित्रपटाचे बजेट दहा कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला होता. महिनाभर चित्रपटगृहांमध्ये टिकून असलेल्या या चित्रपटाने जगभरातून आतापर्यंत १३७.४१ कोटी रुपये कमाई केलेली आहे. कुठलाही गाजावाजा न करता प्रदर्शित झालेला ‘बदला’ हा चित्रपट इतकी कमाई करतो आहे, तरीही चित्रपटाचे निर्माते, वितरक, लाइन प्रोडय़ुसर किंवा अगदी क्षेत्रातील कोणीही वेळ खर्च करून या चित्रपटाचे कौतुक केले नाही, अशी खंत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी चित्रपटाचा निर्माता असलेल्या शाहरूख खानलाही मान्यवर ‘राजा धीरज’ (किंग खान) असे संबोधत ‘बदला’ हा तुमच्या कारकीर्दीतील सर्वाधिक हिट चित्रपट आहे, असे ऐकिवात आले आहे. जेव्हा कोणत्याही कंपनीला यश मिळते तेव्हा त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला दिला जातो. आता आम्हालाही बोनस द्या.. अशी गमतीशीर मागणी अमिताभ बच्चन यांनी केली.

हा संवाद इथेच न थांबवता अमिताभ यांनी त्यांच्या आधीच्या ट्वीटमध्ये बदल करत ‘बदला’ हा रेड चिलीज एण्टरटेन्मेन्टचा आतापर्यंतचा यशस्वी चित्रपट आहे, शाहरूखच्या कारकीर्दीतील नाही, अशी सुधारणा केली. मात्र त्याचबरोबर अगदी कमीत कमी बजेट असतानाही चित्रपटाने इतके यश कमावल्याबद्दल चित्रपटाचे कौतुक व्हायला हवे, अशी अपेक्षाही अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. यावर आम्ही तर तुमच्याकडून पार्टी कधी मिळते आहे, याची वाट बघत आहोत. याच कारणासाठी दररोज रात्री आम्ही ‘जलसा’च्या बाहेर प्रतीक्षा करतो, असे विनोदाने सांगत आपली पडती बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न शाहरूख खानने केला आहे. या दोघांच्याही वरवर नर्मविनोदी वाटणाऱ्या संवादातून एकूणच दोन मोठय़ा कलाकारांमध्ये पडद्यामागे कधीतरी उडणाऱ्या खटक्यांची झलक सर्वसामान्यांना अनुभवायला मिळाली आहे.

पार्टीही तुमच्याकडून हवी

शाहरूख खाननेही क्षणाचा विलंब न करता अमिताभ यांना उत्तर दिले. शाहरूखनेही अमिताभ यांना ‘सर चित्रपट तुमचा आहे. अभिनय तुमचा आहे. हिटही तुमच्यामुळेच झाला आहे. तुम्ही नसता तर चित्रपटच झाला नसता..’, असं सांगत मग पार्टीही तुमच्याकडूनच हवी.. असे सुचवले.

First Published on April 16, 2019 1:25 am

Web Title: amitabh bachchan shah rukh khan twitter fight over badla movie success