बॉलीवूडमध्ये ‘एबी’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता अभिषेक बच्चन काल ४१ वर्षांचा झाला. आपल्या लाडक्या लेकाच्या वाढदिवसादिवशी बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अभिषेकसोबतचे काही जुने फोटो त्यांच्या ब्लॉगवर शेअर केले.

अमिताभ यांनी ब्लॉगवर लिहिलेय की, त्यावेळी १९७६ साली त्याचा जन्म होणार होता. मी ब्रिच कॅन्डी रुग्णालयात धावत गेलो. त्यानंतर तो मोठा होत गेला आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये असा दिसू लागला. पुढे त्यांनी लिहिलेय की, माझा बच्चन यांच्या (हरिवंशराय बच्चन) मुलाच्या रुपात जन्म झाला होता. जो एकही अक्षर बोलण्या शिकण्याआधीच एक सेलिब्रिटी झाला होता. अभिषेक हा अमिताभ बच्चन याच्या मुलाच्या रुपात जन्माला आला आणि सेलिब्रिटी शब्दाचा अर्थ समजण्यापूर्वीच तो एक सेलिब्रिटी झाला. त्यांनी म्हटले की, माझे वडिल एक प्रसिद्ध आणि सन्मानिय व्यक्ती होते. या नावाशी माझं नाव जोडलं गेल्याने सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक कायदे पाळणे मला गरजेचे होते. अभिषेकलाही या सगळ्यातून जावे लागले आणि अजूनही जावे लागतेय, असे अमिताभ यांनी म्हटले.

अमिताभ यांनी पुढे लिहिलेय की, ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील तो क्षण मी कसा विसरेन. याविषयी त्यांनी लिहले की, ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि आमच्या कुटुंबाचे डॉक्टर शाह बाहेर आले. त्यांनी मला विचारले, तुला काय हवं होत? त्यांच्या चेह-यावरील हसूने मला सगळं काही कळलं होतं. आम्हाला मुलगा झाला होता. त्यावेळी मी शॅम्पेनची बॉटल खोलली आणि ड्यूटीवर असलेल्या सर्व नर्स आणि सिस्टर्सना त्यांच्या परवानगीशिवाय आणि नियमांना डावलून शॅम्पेनचा एक-एक घोट पाजण्यात आला. कुटुंबात एका नव्या सदस्याच्या येण्याचा आनंदच वेगळा होता.

बॉलिवूडचा वारसा लाभलेल्या अभिषेकने ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिषेकला सुरुवातीच्या काळात फारसे यश मिळाले नाही. चित्रपटाव्यतिरिक्त अभिषेकच्या शिक्षणाबद्दल बोलायच तर,जमुनाबाई नर्सरी स्कूल, बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि दिल्लीतील मॉडर्न स्कूल असा अभिषेकचा शैक्षणिक प्रवास झाला. व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी अभिषेकने अमेरिकेला उड्डाण केले. त्यानंतर त्याने अभिनयाच्या ओढीने शिक्षण अर्ध्यावरच सोडून पुन्हा स्वप्न नगरी गाठली. कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयश पचविल्यानंतर अखेर २००४ मध्ये अभिषेकला यशाचे कवडसे दिसले. ‘धूम’ चित्रपटाने त्याला अखेर एक ओळख स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यात यश आले, असे म्हणता येईल. सहायक कलाकार म्हणून अभिषेकला ‘धूम’ चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.