अभिनेते शशी कपूर यांनी हिंदी रुपेरी पडद्यावर बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या दोन्ही अभिनेत्यांच्या स्टारडमच्याही खास चर्चा चित्रपट वर्तुळात रंगल्या. शशी कपूर यांच्या निधनानंतर बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक आठवण सांगितली.
शशी कपूर अमिताभ बच्चन यांना प्रेमाने ‘बबुआ’ म्हणून संबोधत असत. त्यामुळे याच नावाचा उल्लेख करत ‘शशीजी…. तुमच्या बबुआकडून….’, असे लिहित त्यांनी ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी आपल्या ब्लॉगची लिंकही जोडली. त्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच त्यांनी रुमी जाफरी यांचा एक शेर लिहिला होता. तर शशी कपूर यांच्या जाण्याने माझ्या आणि त्यांच्या आयुष्यातील बरेच महत्वाचे आणि कधीही इतरांसमोर न आलेले किस्सेही निघून गेले असे म्हणत त्यांनी ब्लॉगचा शेवट केला. भावनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी त्यांनी शब्दांचा वापर करत या ब्लॉगमधून एक वेगळेच शशी कपूर सर्वांसमोर आणले. सहकलाकारापेक्षा जवळचा मित्र जाण्याचे दु:खच जास्त असल्याचे त्यांचा ब्लॉग वाचताना लक्षात येते. शशीजींच्या दिसण्यापासून ते अगदी खासगी आयुष्यात खालावलेल्या त्यांच्या परिस्थितीवरही बच्चन यांनी प्रकाशझोत टाकला. यामध्ये शशीजींच्या त्या प्रसिद्ध हेअरस्टाईलकडेही त्यांनी न विसरता सर्वांचे लक्ष वेधले.
T 2731 – To Shashji from your ‘babbua’ .. !! https://t.co/MFYeeR1Sbb pic.twitter.com/rfzDdDtiBk
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 4, 2017
ब्लॉगच्या शेवटी त्यांनी ठराविक काळी शशीजींची भेट न घेतल्याचे स्पष्ट केले. शशी कपूर त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच जेनिफर यांच्या निधनानंतर ते एकटे पडले होते. त्यांनी सर्वांपासून आपला संपर्क तोडून घेतला होता. काळ लोटत गेला, वय वाढत गेलं आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत त्यांची तब्येत खालावत गेली. त्यावेळी आपण रुग्णालयात शशीजींचे भेट घेतल्याचे बिग बींनी स्पष्ट केले. पण, त्यानंतर मात्र बिग बींनी त्यांची भेट घेण्याचे टाळले. कारण, आपल्या अगदी जवळच्या मित्राला रुग्णालयात त्या अवस्थेत पाहण्याची इच्छाच नव्हती, असेही बिग बींनी या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 9:35 am