पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर रविवारी रात्री नऊ वाजता देशातील जनेतेने दिवे, मेणबत्ती लावत मोदींना पाठिंबा दर्शविला. यामध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश होता. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. इतकंच नाही तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर दिवे लावतानाचे फोटो शेअर करत या उपक्रमात सहभागी होण्याचं नागरिकांना सांगितलं. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनीही एक फोटो पोस्ट करत या उपक्रमात सहभागी व्हा असं सांगितलं. मात्र त्यांचं ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी पृथ्वीचा एक फोटो शेअर केला असून या फोटोत पृथ्वीवर भारताचा नकाशा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला त्यांनी हे जग आपल्याला पाहत आहे. आपण सगळे एक आहोत, असं कॅप्शन दिलं होतं. मात्र हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

‘अशा प्रसंगामध्ये तुम्ही खरं गंभीर आहात? की तुमचं ट्विटर अकाऊंट कोणी हॅक केलं आहे’?, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर ‘हा फोटो आताचा नसून फार जुना आहे’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

इतकंच नाही तर ‘कृपया यांच्या हातून कोणी तरी फोन काढून घ्या’, किंवा ‘यांचं व्हॉट्स अॅप डिलीट करा’,असा सल्लाही नेटकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून अमिताभ बच्चन यांच्यावर बऱ्याच वेळा ट्रोल होण्याची वेळ आली आहे. यावेळीदेखील त्यांनी जुना फोटो शेअर केल्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं. सध्या करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात २१ दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.