बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली असून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बींसोबतच अभिषेकलाही करोनाची लागण झाली असून त्याच्यावरसुद्धा याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बी रुग्णालयात दाखल झाल्यापासून चाहते त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी काही ठिकाणी मंदिरात पूजा, होमहवनसुद्धा करण्यात येत आहेत. चाहत्यांचं हे प्रेम पाहून बिग बी भावूक झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले.

‘एसएमएस, व्हॉट्स अॅप, इन्स्टा, ब्लॉग या सर्व सोशल मीडियावरून माझ्या स्वास्थासाठी तुम्ही करत असलेल्या प्रार्थना व तुमचं प्रेम मिळत आहे. माझ्या कृतज्ञतेला कोणतीही सीमा नाही. रुग्णालयाचे काही प्रोटोकॉल आहेत आणि ते प्रतिबंधात्मक आहेत. त्यामुळे मी आणखी काही बोलू शकत नाही. तुम्हा सर्वांना माझं प्रेम’, अशा शब्दांत त्यांनी चाहत्यांचे आभार मानले.

गुरुवारी बिग बींनी सोशल मीडियावर विठ्ठल-रखुमाईचा फोटो पोस्ट करत ‘ईश्वराच्या चरणी समर्पित’ असं लिहिलं. अमिताभ बच्चन रुग्णालयात असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. ११ जुलै रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हाच त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बिग बी व अभिषेक बच्चन हे उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्यांना आणखी सात दिवस तरी रुग्णालयातच राहावं लागणार, अशी माहिती नानावटी रुग्णालयाने दिली होती.

ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गेल्या १४ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पालिकेने सुरू केला आहे. दरम्यान, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा यांची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याचे समजते.