महानायक अमिताभ बच्चन यांनी पोलिओसारख्या भीषण आजाराचे देशातून समूळ उच्चाटन करणारे यशस्वी अभियान राबविले असून, आता ‘बनेगा स्वच्छ इंडिया’ या स्वच्छता मोहिमेला त्यांनी आपले योगदान देऊ केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे स्वच्छ भारत मोहिमेचे सदिच्छादूत आहेत. देशाच्या स्वच्छतेचा मुद्दा बऱ्याच काळापासून आपल्या मनात घर करून बसला असल्याने सदर मोहिमेचा भाग होण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘बनेगा स्वच्छ भारत’ मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘वाघ वाचवा’, ‘पोलिओ’ आणि ‘क्षय रोगा’संबंधी राबविलेल्या मोहिमा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अस्वच्छतेचा विषय माझ्या मनात घोळत होता आणि जेव्हा ही संधी माझ्याकडे चालून आली, तेव्हा मला या मोहिमेचा भाग व्हायचेच होते. आपले वडील आणि गत काळचे प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्याकडून आपण स्वच्छतेचे धडे घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आपले वडील याबाबत अतिशय कडक शिस्तीचे होते. हेदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत. याविषयीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, माझे वडील खूप शिस्तप्रिय होते. लहानपणी अलाहाबादमध्ये राहात असताना, जेव्हा मी धुळ-मातीने माखून घरी आलो, तेव्हा वडिलांनी स्वच्छ होण्यास सांगून आपली चांगलीच खरडपट्टी काढली होती. याबाबत ते कमालीचे कडक होते. आजसुद्धा घरात माझ्याकडून झालेला कचरा मी स्वत: साफ करतो. जोपर्यंत देशात याबाबत बदल होत नाही, तोपर्यंत आपण या मोहिमेद्वारे काम करत राहणार असल्याचे आश्वासन अमिताभ बच्चन यांनी यावेळी दिले.