पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत.

हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून मदतीसाठी हात पुढे केला आहे. मदत करणाऱ्यांमध्ये अमिताभ बच्चन यांचाही समावेश असून सध्या ही मदत कशाप्रकारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

प्रवक्त्यानेही अमिताभ बच्चन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीच्या फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती रद्द केली होती. हा कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलण्यात आला होता.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.