X

..म्हणून नागराज मंजुळेंसोबत ४५ दिवस नागपूरमध्ये राहणार अमिताभ बच्चन

'केबीसी'चं शूटिंग संपल्यानंतर लगेच बिग बी नागपूरला रवाना होणार आहेत.

‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आगामी ‘झुंड’ या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग नागपूरमध्ये होणार आहे. यासाठी बिग बी सलग ४५ दिवसांसाठी काम करणार आहेत. शूटिंगसाठी ते ४५ दिवस नागपूरमध्येच थांबणार असल्याचं कळतंय. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. फिनालेच्या शूटिंगनंतर ते लगेच नागपूरला रवाना होतील.

‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं याविषयीचं कथानक साकारण्यात येणार आहे.