बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतात. आपल्या कुटुंबियांच्या आनंदी क्षण नेहमीच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात हे सर्वज्ञात आहे. आता अमिताभ यांनी आपल्या नातीसोबतचा म्हणजे आराध्यासोबतच्या डेटचा एक किस्सा ब्लॉगद्वारे शेअर केला आहे. नात आराध्याने प्रेमाने एखाद्या इटालियन रेस्तरॉमध्ये पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबियांना नेहमीच प्राधान्य देणाऱ्या अमिताभ यांनी नातीचे मन दुखविणे अशक्यच होते. अमिताभ यांनी त्यानंतर नातीला घेऊन तिला हव्या असणाऱ्या रेस्तरॉमध्ये जाण्याची तयारी दर्शविली. अर्थात त्यांनी आपल्या नातीची इच्छापूर्ण करण्यासाठी तिला खास वेळ दिला. यावेळी रेस्तरॉमध्ये नातीने वेटरला दिलेल्या व्हॅलेंटाइनचा खास उल्लेख त्यांनी आपल्या ब्लॉगमधून केला आहे. ज्यावेळी वेटरने आराध्याला तिने मागितलेली डिश आणून दिली त्यावेळी तिने वेटरला हॅपी ‘व्हॅलेंटाईन डे’ अशा शुभेच्छा दिल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे.

आपल्या मुलीचा उल्लेख अमिताभ जसे जगातील सुंदर मुलगी म्हणून करतात अगदी त्याच पद्धतीने ते आपल्या नातीवरही प्रेम व्यक्त करत असतात. आरध्याच्या वाढदिवसा दिवशी आजोबा बिग बी यांनी ती जगातली सगळ्यात सुंदर नात असल्याचे म्हटले होते. बच्चन कुटुंबियांवर बॉलिवूड जगताताचे लक्ष असते. काही दिवसांपूर्वी  बच्चन कुटुंबातील ज्युनिअर बच्चनने म्हणजेच अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो पोस्ट करत अनेकांचेच लक्ष वेधले होते. अमिताभ बच्चन यांच्या मोठ्या मुलीने हे सुरेख क्षण कॅमेऱ्यात कैद केल्याचे पाहायला मिळाले होते. पापा अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांच्यासोबत मोबाईलमध्ये काहीतरी पाहतानाचा कँडिड फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. अभिषेकने पोस्ट केलेला हा फोटो आणि त्यासोबत लिहिलेले कॅप्शनही फोटोला साजेसे होते.

‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी त्यांच्यासाठी (आई-वडिलांसाठी) तुम्ही नेहमीच त्यांचे तान्हे बाळ असता.’, असे कॅप्शन अभिषेकने लिहिले असून सोबतच न विसरता या फोटोसाठी मोठ्या बहिणीला श्रेयही दिले आहे. सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते. त्यातही अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाविषया चाहत्यांना विशेष आत्मियता आहे ही बाब नाकारता येणार नाही. अभिषेक बच्चनच्या बालपणातील फोटोपासून ते अगदी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्या पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षणांपर्यंतचे सर्वच फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशा या बच्चन कुटुंबाला ‘द फर्स्ट फॅमिली ऑफ बॉलिवूड’ म्हणूनही संबोधले जाते. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्यावरील अमिताभ प्रेमही असेच अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वी अमिताभ यांनी नातीसाठी लिहिलेली कविता चांगलीच लोकप्रिय झाली होती.