दिवसभरातील घटनांमधून जे जे चित्ती उमटते ते ते ब्लॉगवर प्रकट करण्याची सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची सवय ही बॉलिवूडजनांसह इतरांनाही माहिती झाली आहे. तसेच काहीसे सोमवारच्या अमिताभ-राज भेटीनंतरही घडले.
मधल्या काळातील भांडणतंटे दूर ठेवून जाहिररीत्या एकत्र आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीनंतर खुद्द अमिताभ यांना काय वाटले असेल? हे पाहण्यासाठी त्यांचा ब्लॉग पाहिला गेला. मात्र, अमिताभ यांनी ब्लॉगवर अजिबात राज भेटीचा उल्लेख केला नाही त्याऊलट ज्या षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम घडला त्याच्याच आठवणींना उजाळा देणे त्यांनी पसंत केले.
मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांना विमा संरक्षण कार्ड प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात आले होते. मराठी-उत्तर भारतीय वादातून राज ठाकरे आणि अमिताभ यांच्यात वितुष्ट आले होते. मात्र, सोमवारच्या या जाहीर कार्यक्रमात राज यांनी अमिताभ यांच्याबरोबर समेट झाल्याचे जाहीर केले.
अमिताभ यांनी मनसेच्या या कार्यक्रमाचा ब्लॉगमध्ये उल्लेखही केला. हा षण्मुखानंद हॉल पूर्वी विविध चित्रपट पुरस्कार सोहळ्यांसाठी ओळखला जायचा. ऐन उमेदीच्या काळात त्या हॉलमध्ये पुरस्कारासाठी आलिशान गाडय़ांमधून येणारे कलाकार पाहताना आपल्याला कधीतरी एवढा मानसन्मान मिळवता येईल का?, असा विचार मनात यायचा, असे अमिताभ यांनी म्हटले आहे. या सगळ्या आठवणींबद्दल भरभरून बोलणाऱ्या अमिताभ यांनी या भेटीचे निमित्त ठरलेल्या राज ठाकरे यांचा उल्लेख करणे टाळले .