बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. गेले १७ दिवस ते रुग्णालयात आहेत. या काळात आलेले विविध अनुभव त्यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले आहेत. आपली मानसिक स्थिती ठिक नसून वडिलांची खूप आठवण येत असल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

अवश्य पाहा – वडिलांच्या आठवणीने भावूक झाले अमिताभ; ट्विट करुन म्हणाले…

काय म्हणाले अमिताभ?

बिग बींनी शनिवारी रात्री हा ब्लॉग लिहिला आहे. “करोना हा एक असा आजार आहे जो तुमच्या मानसिक स्थितीवर हल्ला करतो. मानवाला आपल्या कुटुंबियांपासून दूर करतो. करोनाची लागण झालेल्या रुग्णांना एका वेगळ्या खोलीत ठेवलं जातं. जिथे कित्येक आठवडे त्याला माणसं दिसत नाही. डॉक्टर्स येतात, तपासतात, औषध देतात पण पीपीई किट्स घातल्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नाही. ते यंत्रमानव असल्याचा भास होतो. करोनाचा उपचार घेत असताना एक टप्पा असा येतो जेव्हा तुम्ही शारिरीकरित्या बरे होत असता पण एकटेपणामुळे तुम्ही मानसिक स्थिती खालावत जाते. मी देखील सध्या या स्थितीचा अनुभव घेत आहे. रात्री थंडीमुळे हात थरथरतात. झोपण्याचा प्रयत्न करतो पण झोप येत नाही. या एकटेपणामध्ये मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते. मग मी त्यांच्या कविता वाचून मायेची उब अनुभवतो.” अशा आशयाचा अनुभव बिग बिंनी या ब्लॉगमधून शेअर केला आहे.

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांची देखील करोना चाचणी करण्यात आली. यात अभिषेक करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यालाही नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या दोघांनाही लवकरच बरं वाटावं यासाठी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात अमिताभ आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात आली. मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं गेलं. दरम्यान गेल्या १५ दिवसांच्या उपचारानंतर बिग बींच्या तब्येतीत सुधार होत आहे. परिणामी लवकरच त्यांना रुग्णालयात घरी सोडले जाईल अशी शक्यता आहे.

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग वाचू शकता – https://srbachchan.tumblr.com/