अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘केबीसी’चं हे १२ वं पर्व असून शो मेकर्सने या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. मात्र या नव्या पर्वात अनेक बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदाची ‘केबीसी’ची थीम ही करोना आणि लॉकडाउन यांच्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच या नव्या पर्वात ‘ऑडियन्स पोल’ हा लाइफलाइन पर्याय नसेल, असं सांगण्यात येत आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या प्रत्येक ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. त्याच मालिका, चित्रपट किंवा रिअॅलिटी शो यांच्या चित्रीकरणाच्या सेटवरही योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे यंदा ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक या शोमध्ये नसल्यामुळे यंदाच्या पर्वात ‘ऑडियन्स पोल’ हा लाइफलाइनचा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच या शोच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. या सेटवरील काही फोटो बिग बींनी शेअर केले होते. त्यात सेटवर क्रू मेंबर्स पीपीई किट्स घालून काम करताना दिसत होते.

दरम्यान,जुलै महिन्यात अमिताभ यांनाही करोनाची लागण झाली होती. जवळपास चार आठवडे नानावटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २ ऑगस्ट रोजी अमिताभ यांना घरी सोडण्यात आले होते. करोनावर मात करून बिग बी पुन्हा त्यांच्या कामाकडे वळले असून सध्या ते केबीसीच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.