नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे वादळ शमत नाही तोच त्यांचे दुसरे वक्तव्य समोर आले आहे. आपल्या देशात धर्माच्या नावावर तिरस्काराच्या भिंती उभारल्या जात आहेत. निष्पाप जीवांचा बळी घेतला जातो आहे. संपूर्ण देशात तिरस्कार आणि अन्याय यांचा नंगानाच सुरु आहे. या सगळ्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या कार्यालयांवर धाडी घातल्या जात आहेत. त्यांचे कामाचे परवाने रद्द करून, त्यांची बँक खाती गोठवून त्यांना शांत केले जाते आहे. हा आवाज या लोकांनी खरं बोलू नये म्हणूनच दाबला जातो आहे. आपल्या देशाला काय हेच ध्येय गाठायचं आहे का? असाही प्रश्न नसीरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४९ मध्ये आपण देशाची एक घटना स्वीकारली. सुरुवातीच्या काळात यातले ठळक मुद्दे अधोरेखित करण्यात आले ज्यानुसार भारतात राहणाऱ्या सामाजिक आणि राजकीय न्याय मिळाला पाहिजे, विचार करण्याची, व्यक्त होण्याची, कोणताही धर्म स्वीकारण्याची आणि त्यानुसार त्याचे पालन करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देण्यात आले. प्रत्येक माणसाला समान समजलं जावं, उच्च-नीच असा भेद नसावा. प्रत्येक माणसाचा प्राण आणि त्याची मालमत्ता यांचं रक्षण व्हावं हे सगळं आपण घटनेने मान्य केलं. जे लोक गरीबांचे हक्क अबाधित रहावेत यासाठी प्रयत्न करतात, समाज बांधणीला हातभार लावतात ते आपल्या घटनेत जे लिहिले आहे त्याचेच पालन करत असतात. मात्र आता ही परिस्थिती नाही. जे हक्कांसाठी आवाज उठवतात त्यांना तुरुंगात डांबलं जातं. कलाकार, बुद्धीजीवी, कवी, साहित्यिक सगळ्यांना व्यक्त होण्यापासून थांबवलं जातं आहे. पत्रकारांचाही आवाज दाबला जातो आहे असेही नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे. ‘अॅमिनिस्टी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

याआधी विराट कोहली हा उद्धट आहे असं म्हणत त्यांनी विराट कोहलीवर टीका केली होती. त्यानंतर बुलंदशहर हिंसाचाराबाबत वक्तव्य करत या देशात माणसाच्या प्राणापेक्षा गायीचा जीव महत्त्वाचा आहे. माझ्या मुलांना जर धर्म विचारला तर ते काय उत्तर देतील ठाऊक नाही कारण मी त्यांना कोणत्याही धर्माची शिकवण दिली नाही मी त्यांना फक्त माणुसकी हाच धर्म शिकवला आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते. ज्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता तो वाद कुठे शमतो ना शमतो तोच नसीरुद्दीन शाह यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.