ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता आणि अभिनेता अमोल पालेकर यांची भारतातील ऑस्कर ज्युरी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ८८व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतीय चित्रपटांची निवड पालेकर करणार आहेत. १७ सदस्यीय समितीचे ते अध्यक्षपद भूषवतील.
अमोल पालेकर यांच्या निवडीवर अकॅडमीने सहमती दर्शविल्याचे फिल्म फेडेरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सुप्रण सेन यांनी सांगितले. पालेकर यांनी आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. “ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या चित्रपटांची निवड प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही. तसेच, कोणत्या चित्रपटांची निवड करावी यासंबंधी आम्ही अजून कोणताही निकष ठरवलेला नाही. निवड समितीच्या सदस्यांसोबत प्रथम बैठक घेऊन चर्चा केल्यानंतरच पुढचे निर्णय घेण्यात येतील,” असे अमोल पालेकर म्हणाले.
१९७० साली प्रदर्शित झालेले ‘रजनीगंधा’, ‘छोटी-सी बात’, ‘चितचोर’ , ‘गोलमाल’, ‘घरौंदा’ हे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट विशेष गाजले. मराठी चित्रपट ‘आक्रीत’पासून त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘पहेली’ हा चित्रपट २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.