भारतीय चित्रपटसृष्टीने १०० वर्षे पूर्ण केली, त्याचा मोठा आनंद सोहळा आपण साजरा केला. मात्र, ते करताना धंदेवाईक यश मिळालेल्या आणि ज्यांनी तिकीट खिडकीवर धो-धो पैसा कमविला, अशाच चित्रपटांचे कौतुक करण्यात आले. त्या पलीकडे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीत जे प्रयत्न झाले, त्याची दखल अथवा आठवण ठेवण्यात आली नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते व ऑस्कर निवड समितीचे प्रमुख अमोल पालेकर यांनी चिंचवडला बोलताना व्यक्त केली.
व्हीनस आर्ट फाउंडेशन आणि चंद्ररंग डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘एक चित्रकार की खोज में’ या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालेकर आणि चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, ‘चंद्ररंग’चे संचालक शंकर जगताप, संयोजक अमर पाटील, अपूर्वा पाटील आदी उपस्थित होते.
पालकेर म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाने प्रगती केली असल्याने चित्रीकरणावेळी अथवा गाण्याचे ध्वनिमुद्रण करताना काहीही करता येणे शक्य आहे. तंत्रज्ञानाचे फायदे घेतले पाहिजेत. मात्र, त्यापलीकडे जाऊन मूळ तत्त्वानुसार खरा रंग आणि पक्का सूर आहे की नाही, याचे भानही राखायला हवे. महाराष्ट्राचा ‘कान’ अतिशय चांगला झाला आहे. मात्र, तशी ‘नजर’ अजून मिळाली नाही. चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला या प्रांतात आपल्याला रसच राहिलेला नाही. प्राचीन वास्तूंबद्दल आपण चर्चा करतो, मात्र त्या कोणत्या स्थापत्यकलेत बसतात, ते कळत नाही आणि सांगताही येत नाही, ही आपली उदासीनता आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये मुला-मुलींना लहानपणापासून संगीताचे व नृत्याचे शिक्षण दिले जाते, महाराष्ट्रात तसे होत नाही.’’ कोलते म्हणाले,‘‘आताची शिक्षण पध्दती शिकवते, पदवी देते, मात्र शहाणपण देत नाही. हे शहाणपण घरातच मिळाले पाहिजे. मुलांना जे करायला आवडते, ते करू द्यावे.’’ प्रास्तविक अमर पाटील यांनी केले. प्रतिमा जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अपूर्वा पाटील यांनी आभार मानले.