सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ड्रग्सचा मुद्दा समोर आला आहे. भोजपूरी सुपरस्टार व भाजपाचे खासदार रवी किशन यांनी ड्रग्सचा मुद्दा संसदेत मांडला. बॉलिवूडमधील ड्रग तस्करीची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. त्यांच्या या भूमिकेला भोजपूरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिने पाठिंबा दिला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिने जया बच्चन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

“ज्या थाळीत खातात त्याच थाळीत भोकं पाडतात”, असं म्हणत जया बच्चन यांनी बॉलिवूडवर टीका करणाऱ्या कलाकारांविरोधात संताप व्यक्त केला होता. त्यांच्या या टीकेला आम्रपाली दुबे हिने प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या थाळीत खातो त्यामध्ये भोकं पाडत नाही, उलट ती थाळी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतोय.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून आम्रपालीने रवी किशन यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यापूर्वी काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.”