X
Advertisement

अमेरिकेतल्या लोकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून हवाय ‘द रॉक’, त्यावर तो म्हणतो,” मला नाही वाटत….”

एंजेलिना जोली आणि ओप्रा विन्फ्रेही स्पर्धेत

डब्ल्यू डब्ल्यू ई या कुस्तीच्या खेळातून नावारुपाला आलेला अभिनेता ड्वेन जॉनसन. ‘द रॉक’ या नावाने आज तो जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला आहे. आता त्याने अमेरिकेच्या राजकारणाविषयीही विचार केलेला दिसत आहे. तो राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे.

अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतल्या ४६ टक्के लोकांना ड्वेन जॉन्सन हा आपला राष्ट्राध्यक्ष म्हणून हवा आहे अशी माहिती समोर आली आहे. यानंतर यावर ड्वेननेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे त्याच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. ही माहिती शेअर करत ड्वेन म्हणतो, “मला नाही वाटत की आमच्या पूर्वजांनी कधी असा विचार केला असेल की, ६ फुटाचा एक टकला माणूस, ज्याने आपल्या अंगावर अनेक टॅटू काढले आहेत, जो टकिला पितो तो कधी अशा पदावर येऊ शकतो. पण भविष्यात जर असं कधी झालं तर मला खरंच अभिमान वाटेल. तुम्हा सर्वांची सेवा करायला मला आवडेल.”

ड्वेनची अशी प्रतिक्रिया ऐकून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. लवकरच तो राजकारणात येण्याची आणि संधी मिळाल्यास निवडणूक लढवण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षीच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी ड्वेन राजकारणात जाणार अशा चर्चा होत्या. मात्र लवकरच त्यांच्यातला फोलपणा लक्षात आला.

ड्वेनसोबतच अभिनेत्री एंजेलिना जोलीही स्पर्धेत आहे. तिलाही ३० टक्के मते मिळाली आहेत. तर प्रसिद्ध निवेदिका ओप्रा विन्फ्रेला २७ टक्के मते मिळाली आहेत. हॉलिवूड सेलिब्रिटींमधली ही लढत रंजक असली तरी सध्या ड्वेन जॉन्सन आघाडीवर आहे. आता या गोष्टीचा तो कसा फायदा करुन घेतो ही गोष्ट पाहण्याजोगी असेल.

23
READ IN APP
X